॥ सद्गुरू श्रीगुंडामहाराज देगलूरकर संस्थान, देगलूर आणि पंढरपूर. ॥ 

सद्गुरु श्रीचंद्रशेखर एकनाथमहाराज

11.jpg
जन्म : श्रावण शु.१३ शके १८८९

सद्गुरु एकनाथमहाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र चंद्रशेखरमहाराज हे श्रीगुंडामहाराजांच्या परंपरेचे सातवे अधिकारी आहेत. वै.एकनाथमहाराजांनी त्यांना बालपणीच आपला उत्तराधिकार देऊन वैकुंठगमन केले. त्यामुळे  ‘बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते’  या न्यायाने वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच महाराजांनी कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रम सुरु केले व भाविक श्रोत्यांना आपल्या अलौकिक वक्तृत्वाने मंत्रमुग्ध केले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ज्ञानेश्वरीपारायण व चक्रीभजनात नैपुण्य मिळविले.
वेदांतग्रंथाचे सखोल अध्ययन करून महाराजांनी अनेक ग्रंथांचे लेखनही केले आहे. पंढरीत चातुर्मासात त्यांच्या गाथा प्रवचनास व चक्रीभजनास भाविकांचा महापूर येत असतो. वे.मू.वे.शा.सं. श्रीगोपाळशास्त्री गोरे यांच्याकडे त्यांचे वेदांतग्रंथाचे अध्ययन झाले असून भागवत प्रवचनाचाही वारसा त्यांना शास्त्रीमहाराजांकडून लाभला आहे.
पसायपायास, संजीवनसमाधी, सदेहवैकुंठगमन, संकीर्तनमाला,- विठ्ठलसहस्रनामस्तोत्रभाष्यम् (संस्कृत) अशा ग्रंथांचे लेखन त्यंानी केले आहे. लक्षब्राह्मणभोजन, वारकरीसंतर्पण, गाथा-ज्ञानेश्वरीची सहस्रावधि भावीकांसह सामुदायिक पारायणे, तेराकोटी
  ‘रामकृष्णहरी’ नामजपाचे एकदिवसीय आयोजन, असे भव्य कार्यक्रम त्यांनी पार पाडले आहेत. देगलूर ते श्रीक्षेत्र मैलार असा दिंडी सोहळा त्यांनी सुरु केला आहे. प्रतिवर्षी ५/६ हजार भाविक या सोहळ्यात सहभागी असतात.
देगलूर येथे संतांच्या वाङ्‌मयाच्या अध्ययनाची सोय व्हावी व सद्गुरु गुंडामहाराजांच्या संथानची एक गोशाळा असावी, अशी त्यांची इच्छा आहे.