श्रीनारायणमहाराज हे सद्गुरु श्रीगुंडामहाराज (दुसरे) यांचे ज्येष्ठ सुपुत्र. श्रीनारायणमहाराज हे श्रीगुंडामहाराजांच्या परंपरेचे चौथे अधिकारी. तपस्वी, तेजस्वी, नामनिष्ठ, सदाचारी. श्रीनारायणमहाराज महान् अधिकारी संत होते. भजन-पूजन-हरिनामसंकीर्तन यातच ते रंगून जात. देगलूर येथील संस्थानचा विकास त्यांनी केला. महाराजांना त्यांचे पितामह सद्गुरु हरिमहाराज यांचाच गुरूपदेश लाभला. श्रीनारायणमहाराज यांनीच देगलूरच्या उद्दालिका नदीच्या तीरावर सद्गुरु श्रीहरिमहाराजांचे समाधिमंदिर बांधले. देगलूर संस्थानात होणारा श्रीहरिमहाराजांचा पुण्यतिथी सोहळा श्रीनारायणमहाराजांनीच सुरु केला. या सोहळ्याला विशाल नामसोहळ्याचे परंपराविस्तात्मक स्वरूप दिले. याच उत्सवात देगलूर येथे मोठी यात्रा भरते. पौष कृ.३ ते पौष कृ.५ असा तीन दिवस हा उत्सव चालतो. श्रीनारायणमहाराजांनी या उत्सवाद्वारा श्रीगुंडामहाराजांच्या बोधपरंपरेचा विस्तार करून देगलुरात ईश्वर-गुरुनिष्ठांची मांदियाळी जोडली.
महाराजांचा शिष्यवर्ग अफाट होता. तत्कालीन निझामराज्याच्या राजधानीत-हैद्राबादला, सरदारघराण्यातील महाराजांच्या शिष्यांनी त्यांच्या हत्तीवरून मिरवणुका काढल्या होत्या.
‘गुंडामाहात्म्य’ हा मूळपुरुष सद्गुरु गुंडामहाराजांचा आज उपलब्ध असलेला परिष्कृत चरित्रग्रंथ त्यांनी सिध्द करून घेतला.
ज्येष्ठ शुक्ल ४ शालिवाहन शके १८५२ ला ते निवर्तले. त्यांची समाधी देगलूरला उद्दालिकातीरावर आहे.