॥ सद्गुरू श्रीगुंडामहाराज देगलूरकर संस्थान, देगलूर आणि पंढरपूर. ॥ 

सद्गुरु श्रीहरिमहाराज

5.jpg
जन्म : शके १७२४, समाधीः पौष कृ.३ शके १८०९

संत सद्गुरु श्रीगुंडामहाराज यांचा अनुग्रह त्यांचे पुतणे हरिमहाराज यांना लाभला. महाराजांच्या पारमार्थिक परंपरेचा वारसाही हरिमहाराजांनी सांभाळला. सद्गुरु गुंडामहाराजांच्या पश्चात् त्यांच्या उत्तराधिकारित्वाचा अकारण उपस्थित झालेला विवाद, कुठलाही वैयक्तिक स्वार्थ मनात नसूनही केवळ सत्य जगासमोर यावे या हेतूने श्रीहरीमहाराजांनी, नऊ वर्षे झगडून निर्णयात काढला होता. धिप्पाड शरीरयष्टीचे व आजानुबाहु असे ते होते. त्यांना वाचासिध्दी होती.
देगलूरच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनीच केला. हरिमहाराजांचे जीवन म्हणजे परमार्थाचा आदर्श. महाराज ब्राह्म मुहूर्तावर उठत असत. प्रातःस्मरण, भजन, स्नान, संध्या, देवपूजन, सूर्यनमस्कार, गायत्रीजप, चक्रीभजन, सद्ग्रंथांचे वाचन अशी हरिमहाराजांची आदर्श दिनचर्या होती. आपल्या दीर्घायु जीवनात हरिमहाराजांनी सद्गुरु गुंडामहाराजांचे पारमार्थिक धन वृद्धिगंत केले. लोकांना नामस्मरणाचा, चक्रीभजनाचा परमार्थ उपदेशिला. त्यांनी कित्येकांना घरे करून दिली. कित्येकांच्या मुंजी, कित्येकांची लग्ने लावून देऊन महान् परोपकार केला. सद्गुरु गुंडामहाराजांच्या संस्थानाचा व्यावहारिक व पारमार्थिक विस्तार महाराजांनीच केला.
पौष कृष्ण ३ शालिवाहन शके १८०९ या दिवशी देगलूर येथे ते सद्गुरुचरणी विलीन झाले. देगलूर येथे उद्दालिकानदीच्या तीरावर महाराजांचे समाधीमंदिर आहे.