॥ सद्गुरू श्रीगुंडामहाराज देगलूरकर संस्थान, देगलूर आणि पंढरपूर. ॥ 

सद्गुरु श्रीएकनाथ गुंडामहाराज

10.jpg
जन्म : आश्विन कृ.१ शके १८४९. समाधी : माघ कृ.१४ महाशिवरात्री शके १९०३
श्रीगुंडामहाराजांच्या परंपरेतील सहावे अधिकारी. अलौकिक सत्पुरुष. महाराजांच्या अंगी सर्व संतलक्षणे बाणलेली. अत्यंत विद्वान् तितकेच नम्र. भक्ती, गुरुनिष्ठा, संप्रदायनिष्ठा, शास्त्रनिष्ठा, अशा अनेक दैवी सद्गुणांचा आदर्श महाराजांनी आपल्या आचरणातून लोकांना शिकविला. वारकरी संप्रदायातील थोर विद्वान प्रवचनकार, कीर्तनकार, लेखक, संतवाङ्‌मयातील गूढार्थाचे विवेचक, शीघ्रकवी, संस्कृत साहित्याचे व वेदांतग्रंथांचे मर्मज्ञ, विद्यार्थ्यांना अनेक ग्रंथांचे पांक्त अध्यापन करणारे गुरुवर्य असे महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते.
भक्ती आणि वेदांतप्रवणता, रसज्ञता आणि अनासक्ती यांचा मनोज्ञ संगम त्यांच्या ठायी होता. कीर्तन, प्रवचन, चक्रीभजन, लेखन व अध्यापन अशी विविधरूपी संप्रदायसेवा करून महाराजांनी आपले जीवन सार्थकी लावले.
सदाचरण, शांतस्वभाव, अबोलवृत्ती, नित्यनियमनिष्ठा या सद्गुणगणाने सर्व शिष्य व भाविकभक्तांची त्यांच्यावर अपार श्रध्दा होती.
माघ कृ.१४ शके १९०३ ला, महाशिवरात्रीच्या माध्यान्हाला ते श्रीगुरुचरणी विसावले. देगलूरला उद्दालिकातीरावर त्यांची समाधी आहे.

आपल्या कणाकणात साठवलेला सुगंध जगाला देत देत कापूर अंतराळात अंतर्धान व्हावा, तसा आपल्या रोमरोमात साठवलेला भगवन्नामाचा सुगंधरस जगाला मुक्तहस्ताने वाटीत महापुरुष परमात्मरूपात समरस होतो. अंतर्धान होतो. जगाच्या दृष्टीआड होतो. कापूर विरून जातो, पण त्याचा सुगंध बराच वेळ पुढे टिकून रहातो. तसा महात्मा विदेहमुक्त होतो, पण त्याने जगाला वितरित केलेला भगवन्नामाचा सुगंध, त्याचा कीर्तिसुगंध सहवासात राहिलेल्या मंडळीला कितीतरी काळ आनंदित, पुलकित करतो. चंदनाच्या सुगंधाने आकर्षित होऊन त्याच्याजवळ आलेला सर्प जसा चंदनाला कवटाळून असतो, तसा महात्म्यांच्या साधुत्वसुगंधाने आकर्षित होऊन त्याच्याजवळ आलेला सर्पासारखा उग्र जीव त्यांच्या सहवासातील सुगंधक्षणांना निरंतर पोटाळून असतो. चंदन कवटाळून असलेला सर्प, सर्पत्व सोडत नाही. म्हणून तो चंदनाजवळ कोणालाच येऊ देत नाही. साधुचरणांच्या सन्निधीत येताच जीवाचे उग्रत्व नष्ट झाल्याने, पूर्वीचा हा उग्र जीव आता साधु होऊन सर्वांनाच साधुसंगतीत बोलावतो. 

या सगळ्या सुगंधी विचारांची एकदम मनात दाटी होण्याचे कारण, म्हणजे जवळ आलेली महाशिवरात्री. . . . ! आमच्या सद्गुरुंचा तो पुण्यस्ममरणदिवस. 

३९ वर्षे झाली सद्गुरुंना विदेहमुक्त होऊन. आणि तरीही त्यांचा ज्ञानसुगंध, भक्तिसुगंध, साधुत्वसुगंध. . . अजून कसा ताजा आहे! तो कापूर विराला. . . पण परिमळ?. . . तो आहेच अजून आसमंतात भरून!

आश्विन कृ. द्वितीया, मंगळवार शा. शके १८४९; दिनांक २ ऑक्टोबर १९२७रोजी वै. सद्गुरु. गुंडामहाराज(तिसरे) व सौ. राजाबाई अम्मासाहेबांच्या पुत्ररूपात वै. सद्गुरु. एकनाथमहाराजांचा जन्म झाला. जन्माला आल्या आल्या बराच वेळ महाराज रडले नाहीत. ते पाहून वै. सद्गुरु. नारायणमहाराज व वै. सद्गुरु. महीपतीमहाराज, या उभयता बंधूंना, त्यांचे स्नेही प. प. सच्चिदानंदस्वामी म्हणाले, "असे म्हणतात की, "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात", ते आज अनुभवाला आले. प्रत्येक जीव गर्भात असताना तेथील यातनेला उबगलेला असतो. त्यामुळे, 'देवा! एकदा या यातनेतून सोडव रे!मी जन्मभरात क्षणभरही तुला विसरणार नाही. 'असे देवाला शपथेवर बोलतो. पण एकदा का त्या गर्भातून बाहेर येऊन यातनामुक्त झाला, की लगेच रडण्याच्या शब्दातून, "क्वाऽहम् क्वाऽहम्" म्हणजे मी तसे कधी बोललो मी तसे कधी बोललो, असे म्हणत असतो. पण साधुवर्य सद्गुरु. गुंडामहाराजांच्या वंशात जन्माला आलेले हे लेकरू बराच वेळ रडले नाही. म्हणजे सामान्य जीवाप्रमाणे हे देवाला दिलेला शब्द विसरणार नाही, हे लक्षात येते. ". . . यतिवर्यांनी दिलेल्या त्या स्पष्टीकरणाने महाराजांचे आजोबाद्वय वै. सद्गुरु. नारायणमहाराज व वै. सद्गुरु. महीपतीमहाराज, विलक्षण सुखावले. . . . 

पुढे जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांचे "विठ्ठल विठ्ठल"असे अविरल, अविश्रांत चालू असलेले भगवंताचे नामस्मरण ऐकून ज्यांचे कानच नव्हे तर जीवन धन्य झाले, त्यांना महाराजांच्या उपजताच न रडण्याच्या चरित्राविषयी त्या यतिवर्यांनी वर्तविलेले ते भाकित, किती सुयोग्य होते, किती बिनचूक होते, हे पटते. 

पू. महाराजांचे एक ज्येष्ठ बंधू होते, पू. विश्वनाथमहाराज. हे वयाच्या चौदाव्या वर्षीच दिवंगत झाले. अत्यंत धीरोदात्त स्वभाव, कुशाग्र बुद्धी, अभ्यासाची अति आवड, धर्मनिष्ठता, गायत्रीचे विशेष प्रेम, हे त्यांचे विशेष होते. गीतेचा प्रत्येक श्लोक म्हणत श्रीसूर्यनारायणाला नमस्कार घालीत हे नित्य ७०० सूर्यनमस्कार घालीत. 

पंढरपुरात आमच्या मठात वै. सद्गुरु. महीपतीमहाराज, यांच्या म्हणण्यावरून पंडितप्राण भगवान् शास्त्री धारुरकर ब्रह्मसूत्र शांकरभाष्य सांगत. दीपावलीच्या सुट्टीत देगलूरहून पंढरीला गेल्यावर पू. विश्वनाथम. या पाठाला समोर बसत. त्यांचा योग्य असा प्रतिसाद पाहून, "तुला काही कळते का यातले?"असे पू. शास्त्रीम. नी विचारल्यावर, हे "हो" म्हणाले. "सांग पाहू, तुला काय कळले ते. "असे पू. शास्त्रीबुवांनी विचारल्यावर त्यांनी एक तासभर व्यवस्थितपणे सगळा झालेला पाठ खुलासेवार सांगितला. ऐनवेळी माहणाल त्या ओवीवर ते तासभर अस्खलित व्याख्यान करीत. ते पाहून पू. धारुरकरशास्त्री वै. सद्गुरु. महीपतीमहाराजांना म्हणाले, "महाराज!हा कोणी योगभ्रष्ट महात्मा दिसतो. आपण जर याला एकांतात नमस्कार करून प्रार्थना केलीत, तर हा भगवद्दर्शन घडवील नक्कीच!पहा आपण!"यावर वै. सद्गुरु. महीपतीमहाराज म्हणाले, "शास्त्रीबुवा!अहो आपण म्हणता तसा योगभ्रष्ट असावा, असे मलाही जाणवते. मी त्याची शक्ती जाणून आहे. पण वडिल माणसाने लहानाला नमस्कार केल्याने त्याचे आयुष्य कमी होते म्हणतात ना?मग याला नमस्कार करून देवदर्शन मिळवण्यात, याचे आयुष्य कमी होऊन महात्म्याच्या संगसुखृला मुकण्यापेक्षा त्याचे प्रारब्धानुसार असलेले आयुष्य सरेतोवर आमच्या घराला त्यृचा संग लाभावा, हे मला अधिक बरे वाटते. "हे वै. सद्गुरु. महीपतीमहाराजांचे विचार ऐकून शास्त्रीजींनी, हात जोडले. 

सातव्या इयत्तेत सबंध निजामराज्यात विशेष गुणवत्तेने ते उत्तीर्ण झाले होते. परीक्षेनंतर विषमज्वराने त्यांना ग्रासले होते. आपण विशेष गुणवत्तेने उत्तीर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगून ठेवले होते. परीक्षेचा निर्णय जाहीर होण्याच्या २/४दिवस आधीच हे निवर्तले. आपले मरण डोळ्यासमोर असणार्‍या १४वर्षाच्या मुलाने आपल्या १० वर्षाच्या लहान भावाला (वै. सद्गुरु. एकनाथमहाराजांना)भविष्यात त्याच्यावर असलेल्या संस्थानच्या जबाबदारीची जाणीव देऊन, " खोडकर पणा सोडून खूप अभ्यास कर. आपल्या परंपरेची, संप्रदायाची सेवा छान डोळसपणे कर!"असा उपदेश केला. . . . हा उपदेशच दृश्यरूपात महाराजांच्या जीवनाला वेगळे वळण देणारा ठरला. 

हे ज्येष्ठबंधू दिवंगत होईतोवर महाराजांचे पाचवी पर्यंतचे शालेय शिक्षण झाले होते. मराठी, उर्दू फारसी या भाषा व लिपी त्यांना चांगल्या अवगत होत्या. मोडीलिपीही चांगलीच सरावाची होती. इंग्रजी जुजबी येत होते. हिंदीभाषाही ते शुद्ध बोलत. उर्दूचा अभ्यास असला तरी हिंदी व उर्दूची अनावश्यक सरमिसळ ते होऊ देत नसत. 

ज्येष्ठबंधूंच्या निधनानंतर या एकट्या पोराला शाळेसाठी देगलूरला ठेऊन चातुर्मास्यासाठी पंढरपूरला जाणे, वडिलमंडळींना सयुक्तिक वाटेना. म्हणून त्यांनी महाराजांना चातुर्मास्याला जाताना देगलूरहून सोबतच पंढरीला नेले. तेथे श्री. शरच्चंद्र ल. खरे गुरुजींकडे इंग्रजी व संस्कृतचे शिक्षण सुरु झाले. श्री. दत्तोपंत मंगळवेढेकरांकडे मृदंग व तबल्याचे शिक्षण महाराज घेऊ लागले. मठात प्रत्यही वे. शा. सं. गोपाळशास्त्री गोरे यांचे रसाळ व अभ्यासपूर्ण श्रीभागवतपुराण व वै. सद्गुरु. धुंडामहाराजांचेज्ञानेश्वरीप्रवचन, , वै. सद्गुरु गुंडामहाराज व वै. सद्गुरु धुंडामहाराज यांच्याकडे चालू असलेले वेदान्तग्रंथांचे पाठ महाराज ऐकू लागले. तीक्ष्ण बुद्धी, कुठल्याही व्यवधानाला न जुमानणारी बुद्धीला एकाग्र करण्याची शक्ती, अभ्यासाची प्रचंड चिकाटी, योग्य गुरुंचे मार्गदर्शन, वै. सद्गुरु. गुंडामहाराज, वै. सद्गुरु. धुंडामहाराज, यांच्यासारखे दक्ष पालक यामुळे महाराजांच्या अध्ययनाला प्रचंड वेग होता. 

चातुर्मास्याचा काळ असा चौफेर श्रव-अध्ययनात सरत हौता. अशातच महाराज बरेच आजारी झाले. पू. पं. धारुरकरशास्त्री हे वै. सद्गुरु. गुंडामहाराज व वै. सद्गुरु. धुंडामहाराज यांचे विद्यागुरु मोठे निष्णात वैद्यही होते. , 
त्यांच्या मार्गदर्शनात उपचार चालू होते. ते रोज प्रकृती तपासण्यासाठी घरी येत. एकादिवशी काही त्रास होऊन महाराज बेशुद्ध झाले. पू. शास्त्रीबुवांना बोलावून आणले गेले. ते येऊन प्रकृती पहात असतानास. गुंडामहाराजांनी अस्वस्थतेने महाराजांना बेशुद्ध अवस्थेत शास्त्रीबुवांच्या मांडीवर दिले, व "गुरुमहाराज!मुलगा तुम्हाला दाला. आता पहा याचे काय करायचे ते!"असे बोलून गेले. थोड्या उपचारांनी महाराज शीद्धीत आल्यावर शास्त्रीजींनी त्यांना स्वतःच्या घरी पंधरा दिवस ठेऊन घेऊन बरे झाल्यावर घरी पाठवले. 

आता चातुर्मास्य संपत आला. देगलूरी परतण्याची तयारी सुरु झाली. आता पुढे महाराजांच्या शिक्षणाची काय व्यवस्था लावावी?हा प्रश्नसमोर असताना वै. सद्गुरु. गुंडामहाराज व वै. सद्गुरु. धुंडामहाराज यांच्यात विचार होऊन महाराजांना पू. धारुरकरशास्त्रीबुवांकडे शिक्षणासाठी ठेऊन द्यावे, असे ठरले. 

चातुर्मास्य संपला. महाराजांना, "तुला खूप अभ्यास करायचाय. मोठ्ठा ज्ञानी व्हायचय. यासाठी गु. शास्त्रीबुवां कडे रहायचय. चांगला रहा. अभ्यास कर. त्यांना त्रास देऊ नको. "इ. इ. समजावून सांगून, त्यांच्या नात्योपयोगी सामान व अभ्यासाच्या पुस्तकासह शास्त्रीबुवांच्या घरी वै. सद्गुरु. गुंडामहाराज व वै. सद्गुरु. धुंडामहाराज हे दोघेही त्यांचे पालक घेऊन गेले. महाराजांना तिथे सोडून निघताना दोघांचीही मने खूप भरून आली. कंठ दाटून काही बोलता येईना. स्वतःला कसेबसे आवरून वै. स. धुंडामहाराज बोलले, "गुरुमहाराज मुलगा लहान आहे. अवखळ आहे. आपल्याला कदाचित् त्रास होईल. सांभाळून घ्या. "बोलता बोलता त्यांनाही अश्रू अनावर झाले. मग शास्त्री महाराज बोलले, "अहो!याला बेशुद्ध झाला तेव्हां माझ्या मांडीवर देऊन हा तुमचा मुलगा असे गुंडामहाराज म्हणालेत ना! मग हा माझाच मुलगा आहे. तुम्ही काळजी करू नका. स्वस्थ व्हा. ". . महाराजांना तिथे सोडून हे सगळे देगलूरला परतले. साधारण वर्षभरानंतर शास्त्रीबुवांनी महाराजांना स्वतःच पूर्ण मार्गदर्शन करायला सुरुवात केली. संस्कृतव्युत्पत्ती, साहित्य, सांख्य, न्याय या शास्त्रांच्या ग्रंथांचा अभ्यास सुरु झाला. बडोदा, पुणे येथे जाऊन त्या त्या तत्कालीन प्रसिद्ध संस्थांच्या विशिष्ट अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाराज देऊ लागले. त्यात विशेष गुणवत्तेने उत्तीर्ण होऊन पारितोषिके मिळवू लागले. अनेक संबंधित विद्वानांनी, संबंधितांनी पाहुण्यांनी या यशानिमित्त महाराजांसह पालकांकडे व गुरुवर्यांकडे अभिनंदने कळविली. सगळेच आनंदले. 

वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे, या संस्थेच्या काव्यचूडामणी, अद्वैतवेदांतकोविद, ... अशा परीक्षा देऊन त्या त्या पदव्या महाराजांनी संपादन केल्या. एकदा तर लेखी परीक्षेतील एका प्रश्नाचे उत्तर लिहिताना महाराजांनी बाणभट्टांच्या कादंबरीतला एक सबंध उतारा लिहिला होता. तो पाहून तोंडी परीक्षेत परीक्षकांनी लेखी परीक्षेतला तोच प्रश्न विचारला. महाराजांना लगेच उमगले, हा प्रश्न मी लेखीत सबंध उतारा लिहिल्यानेच यांनी विचारलाय. महाराजांनी प्रथम तो सगळा उतारा म्हणून दाखवला. मग त्या परीक्षकाला विचारले, "गुरुजी! हा उताराच काय, मला परीक्षेला नेमलेले सगळेच उतारे पाठ आहेत. आपणास म्हणून दाखवू?" मग परीक्षक म्हणाले, "तू अस कर, सगळे उतारे नकोस म्हणू. फक्त आत्ताच्या उतार्‍या आधीचा व नंतरचा म्हणून दाखव पाहू!"लगेच महाराजांनी ते दोन्ही उतारे म्हणून दाखवले. परीक्षक आनंदाने म्हणाले, "बाळा!तू मनकवडाही आहेस. "आणि पारितोषिकवितरणात या गुणवत्तेचा उल्लेख करून सभेच्या बक्षिसाव्यतिरिक्त त्यांनी स्वतःचे स्वतंत्र बक्षिस महाराजांना दिले. 
परीक्षेनिमित्त पुण्यात गेल्यावर, परीक्षेचा निर्णय घेऊन परतताना धारुरकरपाठशाळेचे विद्यार्थी एकादिवशी महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकरांच्या दर्शनाला जात. एकदा महाराजांचे प्रशस्तिपत्र पाहून, "वा! छान हं!अरे! तू देगलूरकरांचा पोर!तुझ्या घरची ज्ञानेश्वरीचा थोर अभ्यासक होण्याची परंपरा सांभाळण्यासाठी तू असाच उत्तरोत्तर वाढता अभ्यास कर. हो!"असे म्हणून त्यांनी महाराजांच्या हातात पेढा दिला. 

सतत आठ वर्षे अहोरात्र गुरुचरणांच्या सन्निधानात राहून महाराजांनी शास्त्रविद्येत उत्तम प्राविण्य मिळविले. या आठ वर्षांमध्ये

जो गुरु कुळें सुकुलीनु । जो गुरुबंधुसौजन्ये सुजनु ।
जो गुरुसेवाव्यसने सव्यसनु । निरंतर ॥ 
गुरुसंप्रदायधर्म । तेचि जयाचे वर्णाश्रम ।
गुरुपरिचर्या नित्यकर्म । जयाचे गा ॥ 
गुरु क्षेत्र गुरु देवता । गुरु माय गुरु पिता ।
जो गुरुसेवेपरौता । मार्ग नेणे ॥ 
श्रीगुरूचे द्वार । तें जयाचे सर्वस्व सार ।
गुरुसेवकां सहोदर । प्रेमे भजे ॥ 

असेच जीवन ते जगले. त्यामुळे पू. पं. धारुरकरशास्त्रींचे ते अत्यंत प्रेमपात्र छात्र होते. 

गुरु बहुतांची माये । परी एकलौती होऊनि ठाये ।
तैसे करूनि आण वाये । कृपे तिये ॥ 
—असेच महाराजांचे झाले होते. 

श्रीगुरुंचे या अंतेवासी शिष्याविषयी असे विलक्षण प्रेम होते, की, सुतनिर्विशेष हा शब्द त्या प्रेमाचे वर्णन करताना कमी पडावा. गुरुचरण परगावी गेले असताना एखाद्या विद्वानाकडून परगावाहून काही शास्त्रीय प्रश्न आला, तर महाराज त्याला उत्तर देत. शास्त्रार्थ लिहून पाठवीत. गुरुवर्यांच्या नावे लेख लिहून पाठवीत. पाठशाळेतील समारंभात संस्कृतभाषेत व्याख्याने देत. काव्ये रचत. कुठल्याही वृत्तात महाराज अतिशीघ्र रसाळ अशी रचना करीत. परीक्षेची उत्तरपत्रिका काव्यात लिहायची म्हटले तर तेही त्यांना जमावे, असे ते शीघ्रकवी होते. एका गणेशोत्सवात त्यांनी रोज दहा श्लोक रचून एक 'गणेशस्तुतिशतक' रचलेले आमच्याकडे आहे. "महाराजांच्या संस्कृत बोलण्यात लालित्य, अलंकारप्राचुर्य असे, नेहमीच्या सर्वसाधारण बोलण्या लिहिण्यात प्रचारात नसलेले असे भारदस्त शब्द व धातु असत. "असे त्यांच्याविषयी एकदा गुरुवर्य खंदारकरमहाराज म्हणाले होते. महाराजांना रागदारीचे ज्ञान होते. पण स्वराची अनुकूलता नव्हती. त्यामुळे ते गाऊ शकत नव्हते. बाकी मृदंग व तबला ते चांगला वाजवीत. 

अफाट वाचन, प्रचंड धारणाशक्ति, कुशाग्रबुद्धी, उदंड पाठांतर, अलौकिक विचारशक्ति, विलक्षण तर्कसंगती, या भगवद्दत्त विशेषांसोबत धारुरकरशास्त्रीजींसारख्या गुरुचरणाचे अखंड मार्गदर्शन, (महाराजांचे रहाणे गुरुगृहीच असल्याने मध्यरात्रीही महाराज जागे असतील तर गुरुवर्य पाठ सांगत असत. )यामुळे शास्त्रग्रंथांसह संतवाङ्मयाचा महाराजांचा अभ्यास सर्वंकश, परिपूर्ण असा झाला होता. 

महामहोपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे. विद्वद्रत्न भगवान् शास्त्री सोनपेठकर, पंडितराज राजेश्वरशास्त्री द्राविड, वीतराग महात्मा स्वामी करपात्रीजी, जगन्नाथपुरीचे शंकराचार्य निरंजनदेवतीर्थ, पं. देवनायकाचार्य, पं. अनंतकृष्णशास्त्री... अशा अनेक पंडितांचा धर्माचार्यांचा कुणाचा बराच, तर कुणाचा अल्प काळ, असा सहवास महाराजांना लाभला.