जन्म : माघ शु.७ रथसप्तमी शके १६७५, समाधीः आश्विन शु.३ शके १७३९
मराठवाडा ही संतांची भूमी. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर हे एक संततीर्थ. देगलूर येथील संत सद्गुरु श्रीगुंडामहाराजांनी व त्यांच्या परंपरेने वारकरी संप्रदायात, पंढरीत वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे.
संतवर्य श्रीगुंडामहाराजांचा जन्म शके १६७५ माघ शु.७ रविवारी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ‘महिपती नाईक’. गुंडामहाराज बालपणापासूनच भजनरंगी रंगलेले, परमार्थमार्गी उत्कट भक्तीच्या बळावर श्रीपांडुरंगाचा सगुण साक्षात्कार त्यांना झालेला.
बालपणीच महाराजांचे मातृ-पितृ छत्र हरवले. नात्यातील एका वृध्द स्त्रीने त्यांचा सांभाळ केला, आणि ‘माय जगन्नाथ | बाप जगन्नाथ’ या उक्तीचा अनुभव त्यांनी घेतला. घरी सराफीचा धंदा होता पण ‘दिनरजनी हाचि धंदा | गोविंदाचे पोवाडे |’ असेच महाराजांचे जीवन बनले. भजन, कीर्तन, संतसमागम, सद्ग्रंथांचे पठण यातच महाराज रमू लागले.
देगलूर येथेच श्रीसंत चूडामणीमहाराज नावाचे थोर साक्षात्कारी संत होते. नाथसंप्रदायाची बोधपरंपरा त्यांना लाभलेली. त्यांची गुरुपरंपरा महान. आदिनाथ- मत्स्येंद्रनाथ- गोरक्षनाथ- गहिनीनाथ- निवृत्तिनाथ- ज्ञानेश्वरमहाराज- देवनाथ- चूडामणीमहाराज अशी ही परंपरा. त्याच चूडामणीमहाराजांनी गुंडामहाराजांना आपले शिष्यत्व प्रदान करून त्यांचा पारमार्थिक अधिकार वृध्दिंगत केला. श्रीगुरुंच्या अनुग्रहानंतर श्रीगुंडामहाराजांच्या परमार्थाला अधिकच धार प्राप्त झाली. परमेश्वर प्राप्तीची आस लागली. एका दिवशी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्वाचे दान करून महाराज पत्नीसह परमेश्वरप्राप्तीच्या मार्गास निघाले. बारावर्षे खडतर तपाचरण करून शेवटी परमेश्वरभेटीवाचून भजन संपवायचेच नाही असा निश्चय करून महाराज भजनास उभे राहिले. हे भजन चौदा दिवस चालले व चौदाव्या दिवशी त्यांना याच भजनात श्रीविठ्ठलाचा सगुण साक्षात्कार झाला. हेच महाराजांच्या परंपरेतील चक्रीभजन. चक्रीभजनाचा नित्यनियम या परंपरेत सांभाळला जातो. श्रीवीरनाथमहाराज औसेकर, श्रीरामचंद्र बुटी, श्रीबालमुकुंदस्वामी इ. महान् अधिकारी शिष्यांच्या हाती गुरुपरंपराप्राप्त पारमार्थिक धन देऊन महाराजांनी नाथसप्रदायाचा मोठाच विस्तार केला आहे.
शेवटचे बाजीराव पेशवे, बापू गोखले, पेशव्यांचे एक विश्वासू सेवक त्र्यंबकराव डेंगळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इत्यादि मातब्बरांचाही महाराजांविषयी श्रध्दाभाव होता. महाराजांचे पंढरपूरच्या वाळवंटातील समाधीमंदिर-मेघडंबरी पेशव्यांनीच बांधली आहे.
आश्विन शु.३ शा.शके १७३९ ला महाराज विठ्ठलचरणी विलीन झाले. संत सद्गुरु श्रीगुंडामहाराजांची अभंगगाथा प्रसिध्द झालेली असून त्यांचे ‘गुंडामाहात्म्य’नावाचे विस्तृत ओविबध्द चरित्रही उपलब्ध आहे. महाराजांची पारमार्थिक परंपरा त्यांच्या वंशजांनी अत्यंत निष्ठेने व सामर्थ्याने चालवली आहे.