जन्म : अधिक ज्येष्ठ शु.२ शके १८२६. समाधीः कार्तिक कृष्ण ८ शके १८८६
श्रीसद्गुरु नारायणमहाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र. श्रीगुंडामहाराजांच्या परंपरेचे पाचवे अधिकारी. ज्ञानेश्वरीचे थोर प्रवचनकार. वेदांतशास्त्र, संतवाङ्मयाचे मर्मज्ञ. महाराजांनी चक्रीभजननिष्ठेतून चक्रीभजन-साथिदारांचा मोठा संच निष्णात केला. भजनरंगात सात्विक ताल-नृत्यांचे नवप्रकार आणले. तसे ज्ञानेश्वरीप्रवचनातही नवनवीन प्रकारांची योजना करून भाविकांना भजन-प्रवचनाकडे आकर्षित केले. त्यांचे चक्रीभजन म्हणजे भजनप्रेमीजनांना मिळणारी मेजवानीच, तर त्यांचे प्रवचन हे ज्ञानतपस्वी श्रोत्यांसाठी अमृतपानच !
ब्रह्मलीन वीतराग श्रीकरपात्रीजी स्वामी, पंडितराज राजेश्वरशास्त्री द्राविड, पंडित श्रीदेवनायकाचार्यजी अशा तत्कालीन महन्महनीय धर्मरक्षकांचा त्यांच्याशी जवळचा संबंध होता. पंडित श्रीरामशर्मांचा व महाराजांचा सतत पत्रव्यवहार चाले. त्यांनी त्यांच्या अफाट लेखनसागरातली दोन ग्रंथरत्ने महाराजांना समर्पण केली होती. महाराजांचे वाचन अफाट होते. त्यांनी प्रत्यही एक पारायण संपवून ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीची ओळीने सत्तावीसशे पारायणे केली होती. महानिर्वाणापूर्वी श्रीज्ञानोबारायांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी केले जाणारे पारायण त्यांनी निजल्या निजल्याच पूर्ण केले व कार्तिक कृष्ण ८ शालिवाहन शके १८८६ ला श्रीविठ्ठलचरणी पंढरीत देह ठेवला. त्यांची समाधी चंद्रभागेच्या वाळवंटात मूळपुरुषांच्या समाधीच्या मागच्या बाजूला आहे.