gunda_maharaj.png
Pandurang4.png
Maharaj4.png

॥ सद्गुरू श्रीगुंडामहाराज देगलूरकर संस्थान, देगलूर आणि पंढरपूर. ॥ 

अखंडानंदरुपाय सव्विज्ज्ञानप्रदायिने । भवध्वांतदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः ॥

हरिं गुंडा गुरुंचैव नारायण गुरुं तथा। महीपतींच गुंडाख्यं एकनाथं नमोनमः ॥

॥ श्री ॥

      सद्गुरू गुंडामहाराज देगलूरकर हा एक पावणे तीनशे वर्षांपूर्वी वारकरी सांप्रदायाच्या क्षितिजावर उगवलेला देदीप्यमान ज्ञानसूर्य होता. प्रखर वैराग्य, समाजोन्नतीची तळमळ, दैवीगुणांचा समाजात परिपोष व्हावा यासाठीची अखंड क्रीयाप्रवृत्ती, समाजातील दीन दुर्बल, रंजले-गांजले यांना हृदयाशी धरून, त्यांच्या दु:खावर फुंकर घालून, त्यांना समाजरत करण्याचे अलौकिक सामर्थ्य, वैराग्यशील व उदारवृत्ती आणि तिच्या योगाने समाजातील सर्वच्या सर्व स्तरातील लोकांना कशाही पद्धतीची मदत करण्याची तयारी,सर्व वेद-शास्त्रातील अप्रतिहत गती व त्या ज्ञानाचे समाजहितासाठी समायोजन करण्यातील निरुपम कुशलता अश्या अनेक सद्गुणांनी महाराज संतपदावर आरूढ झालेले होते. अशा एका दिव्यातम विभूतीने स्वत: जीवनात अनुष्ठीलेली व आपल्या अनुयायींना आखून दिलेली कार्यप्रणाली  जगहित साधन समर्थ ठरली. त्या त्यांच्या कार्यप्रणालीने सातत्याने अडीचशे वर्ष समाजात सन्नीतीचे जतन करण्यास मोठे योगदान दिले आहे. महाराजांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, चेन्नई अश्या अनेक प्रांतात विस्तारलेले आहे.
   

     सद्गुरू गुंडामहाराजांनी आपल्या जीवनात श्री पांडुरंग साक्षात्कारासाठी प्रथम आपला सराफीचा धंदा,सावकारी, घरदार अश्या सर्वस्वावर तुलशीपत्र ठेवले. संपूर्ण घर लुटविले. त्यानंतर कशी, गाय, प्रयाग अशी त्रीस्थळी यात्रा केली. त्यानंतर देगलूर जवळ श्रीरामपूर क्षेत्रात आपल्या भार्येसह राहून बारा वर्षे केवळ कडूनिंबाचा पाला खाऊन ताप केले. त्यानंतर चौदा दिवस अखंड भजन केले. (त्याच भजनाला चक्रीभजन असे म्हणतात.)

*****

सद्गुरु श्रीचंद्रशेखर एकनाथमहाराज

श्रीगुंडामहाराजांच्या परंपरेचे सातवे अधिकारी
Maharaj3.png

॥ मम मना भज त्या गुरूच्या पदा ॥

सद्गुरु एकनाथमहाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र चंद्रशेखरमहाराज हे श्रीगुंडामहाराजांच्या परंपरेचे सातवे अधिकारी आहेत. वै.एकनाथमहाराजांनी त्यांना बालपणीच आपला उत्तराधिकार देऊन वैकुंठगमन केले. त्यामुळे  ‘बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते’  या न्यायाने वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच महाराजांनी कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रम सुरु केले व भाविक श्रोत्यांना आपल्या अलौकिक वक्तृत्वाने मंत्रमुग्ध केले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ज्ञानेश्वरीपारायण व चक्रीभजनात नैपुण्य मिळविले.