॥ सद्गुरू श्रीगुंडामहाराज देगलूरकर संस्थान, देगलूर आणि पंढरपूर. ॥ 

आगामी कार्यक्रम

  • || श्रीराम-श्रीतुकाराम सयुक्त कथा || श्री क्षेत्र अयोध्या दि. १८ मे ते २२ मे २०२५


                 अयोध्या ही मोक्ष देणार्‍या सात पुर्‍यांपैकी एक पुरी आहे. महान् तीर्थक्षेत्र आहे. प्रभु श्रीरामरायांच्या आधीही श्रीहरिश्चंद्रादि मोठमोठे,"रघुकुलरीति सदा चलि आई । प्राण जाई पर बचन न जाई ॥",अशा दृढप्रतिज्ञेने वागणारे, आदर्श सद्गुणसंपन्न राजे, याच अयोध्येच्या भूमीत जन्माला आले. याच अयोध्येने त्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवले, मोठे केले, जगभर मिरवले. याच अयोध्येने आपल्या कुशीत वावरणार्‍या प्रत्येक राजाच्या त्या त्या काळातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेले महर्षि श्रीवसिष्ठांसारख्या, श्रीविश्वामित्रांसारख्या, देवर्षि नारदांसारख्या परमज्ञानी श्रीगुरुंचे मार्गदर्शन, त्या त्या राजांना श्रीवसिष्ठांदिकांनी केलेल्या उपदेशातून सिद्ध करून, ते जतन करण्याचे काम, याच अयोध्येने केले. श्रीशरयूसारख्या सरस्वतीच्या तोडीची म्हणून वेदाने मान्य केलेल्या, मानससरोवराच्या प्रवाहरूपातल्या एका दिव्य नदीला आपल्याकडे अत्यंत प्रेमाने बोलावून घेतले. 

    "अष्टाचक्रा नवद्वारा देवानां पूरयोध्या ।
    तस्यां हिरण्मयः कोशः स्वर्गो ज्योतिषावृतः ॥"
    (—हे अथर्ववेदात आलेले वर्णन आधिभौतिक अर्थाने श्रीक्षेत्र अयोध्येचे मानले जाते.ही नगरी आठ चक्रे, नऊ द्वारे असलेली आहे. ही देवांची पुरी आहे. तिच्या मध्यात स्वर्णमय देदीप्यमान् कोष असून तो परमानंदाने व चित्प्रकाशाने डबडबलेला आहे. अशा या पुरीला कोणीच शत्रू जिंकू शकत नसल्याने हिला,"अयोध्या", हे नाव आहे.)

    असे,आपल्या सद्गुणसंपदेच्या बळावर, अपौरुषेय वेदालाही आपले वर्णन करायला भाग पाडले. अशी पुण्ये मिळवत, ती वाढवत, स्वतःत "नित्य-साकेत-धामाची", गुणवत्ता निर्माण करून, भगवंताला पूर्णावतारी प्रभु श्रीरामरायांच्या रूपात आपल्या कुशीत अवतीर्ण करून घेतले. श्रीलक्ष्मण, श्रीभरत, श्रीशत्रुघ्नांसह त्यांना खेळवले, हंसवले, सावरले. प्रभु दर्शनाच्या निमित्ताने आलेल्या जगाला पवित्र करणार्‍या अनेक महापुरुषांचे चरणरज मिळवले, ते जपले. तिथून पुढे रामरायाचे जन्मस्थानावरील मंदिर, हे मुख्य मंदिर व इतरही मंदिरे घेऊन सतत रामस्मरणात ही अयोध्यानगरी आनंदाने, "आजि आनंदु रे आजि परमानंदु रे। ", असे गुणगुणत, डोलत, नित्यतृप्तीत होती. या कल्पाच्या आरंभापासून सत्तावीस महायुगे, कुठलेच दुःख हिला भोगावे लागले नव्हते. पण चालू असलेल्या अठ्ठाविसाव्या महायुगातील, घोर कलिकालात—

    "आश्रमा यवनै रुद्धास्तीर्थानि सरितस्तथा ।
    देवतायतनान्यत्र दुष्टैर्नष्टानि भूरिशः ॥"
    (आमचे पवित्र आश्रम, तीर्थे, नद्या, हे सगळं यवनांनी बळकावलं. अडवून ठेवलं. भ्रष्ट केलं. या दुष्टांनी अनेक देवतांची मंदिरेही उध्वस्त करून टाकली.)

    —या भागवतमाहात्म्यातील निर्देशानुसार अयोध्येतील श्रीप्रभु श्री रामरायांचे जन्मस्थानावरील मंदिर, दुष्टांनी उध्वस्त केले. तेव्हांपासूनचा श्रीअयोध्या आणि श्रीशरयू, दोघींचाही आक्रोश, आकांत, कुठल्यही सच्चा हिंदूला तीव्र वेदना देत होता. दंडकारण्यात कुणाला कुठलाच त्रास न देता सतत तपस्येत रत असणार्‍या ऋषिमुनींना मारून, त्यांचे मांस खाऊन, त्यांच्या हाडांचे राक्षसांनी रचलेले ढीग पाहून सीतामातेच्या हृदयाला वेदना झाली ना, अगदी तशी, तेवढी वेदना पाच शतके सगळ्या हिंदूंनी अनुभवली. पण, "सत्यमेव जयति नानृतम् ।", या नियमानुसार, सत्याचा विजय होऊन, श्रीरामलला, आज त्यांच्या जन्मस्थानावर भव्य व वैभवी मंदिरात विराजमान् झाले आहेत. शतकानुशतकाचे शल्य गेले. आनंदाची पहाट उजाडली. याचा आपणा सर्वच हिंदूना आनंद आहे.

    प्रत्यक्ष अयोध्येत जावून, श्रीरामललांना पहावे, आपल्या व्यस्त जीवनातून त्यांच्या सान्निध्यात अल्पस्वल्प काळ रहावे, अयोध्येला व शरयूला,त्यांच्या युगानुयुगातील पुण्यसंचयाबद्दल आणि देवाच्या मंदिराच्या विध्वंसाचे शल्य वागवत, पुन्हा देवाने वैभवाने माझ्या कुशीतील त्यांच्या जन्मस्थानी विरजित व्हावे, यासाठी, मौनपणे, अपमान, तिरस्कार, बलात्कार, अशी असंख्य प्रतिकूले सहन करत केलेल्या, प्रदीर्घ व दिव्य तपाबद्दल त्यांना एकदा साष्टांग नमन करावे, प्रगाढ आलिंगन द्यावे, आनंदाश्रूसह दोन प्रेमाश्रू त्यांच्या चरठी ढाळावेत. श्रीरामप्रभूची कथा ऐकावी, अशा भावनेतून हा श्रीगुरुंच्या कथेचा कार्यक्रम आपण आखत आहोत. 

    शिवाय आपणां वारकर्‍यांसाठी यावर्षी जगद्गुरु श्रीतुकाराममहाराजांच्या वैकुंठगमनाचे त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी(३७५वे) वर्ष,असा पर्वकाळ आला आहे.
    म्हणून श्रीराम-श्रीतुकारामकथा अशी सयुक्त कथा आपण आयोजित केली आहे. श्रीरामकथेतून-जगद्गुरु श्रीतुकाराममहाराजांची कथा अशी समसमासंयोगात्मक  ही कथा होईल.
Auyodhya_pa_2.jpeg
Auyodhya_pa_1.jpeg